Tuesday 23 October 2012

वेळापूरचे प्राचीन श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिर




देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले. वेळापूरची प्राचीनता पहायची झाल्यास एक हजार वर्षे मागे जावे लागते. खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले. यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नांव एकचक्रनगर असे होते. महाभारताचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी दक्षिणेकडचा भाग हा दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. यावरूनच वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषी-मुनींनी तपश्‍चर्या केली आहे. म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी, पावनभूमी अशी आहे. शांडिल्य ऋषीसह अनेकांनी येथे तपश्‍चर्या केली आहे.
महाभारत ते यादवकाल या कालावधीमध्ये वेळापूरबाबतचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र यादवकालापासून इ.स.१३०० पासूनचे पुरावे येथे आढळतात. देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर. वेळ म्हणजे सीमा. पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गांव. यावरून वेळापूर हे नांव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे. माणदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाईदेवराणा हे पहात होते. एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अनन्य साधारण महत्व होते. त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरभराटीस आलेले होते.
त्याकाळात पर्यटनस्थळ म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा, येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला. या जिर्णोद्धाराचा संकल्पक बाईदेवराणा होते. स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते. पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा, गाभार्‍यात पिंड व आतील नंदी, तो ही उघड्यावर एवढेच असावे. नंतर सर्व बाजूंनी जिर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी. कारण इतरत्र कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी नाहीत.
या जिर्णोद्धाराचे बांधकाम इ.स.१३०० व इ.स.१३०५ या टप्प्यात झाल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. सध्याची मूर्ती प्रतिष्ठापना सोमवार दि.२२ नोव्हेंबर १३०५ रोजी केल्याचा उल्लेख तीन शिलालेखातून आढळतो. श्री अर्धनारी नटेश्‍वराच्या मूर्तीची रचना अत्यंत कोरीव असून ही मूर्ती सालंकृत आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत उच्चप्रतीची शिल्पकृती आहे. मूर्तीकाराने मूर्ती कोरताना वस्त्रांऐवजी अलंकाराचा वापर खुबीने केला आहे. अत्यंत देखणी अशी ही मूर्ती १.१५ मीटर उंचीची आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आतील नंदी, दक्षिणी भिंतीत ब्रह्मा, मद्विश्‍वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा अशा सात मातृका, वीरभद्र व गणपती आहे. बाजूस उपदेवता, उत्तरेला शेजघर आहे. छतास काही विरगळ वापरले आहेत. मुख्य गाभार्‍यात शिवलिंगावर सालंकृत शंकर-पार्वतीची मूर्ती उभी आहे. वर किर्तीमुख, किर्तीमुखापासून दोहोबाजूस अष्टगण, ब्रह्मदेव, विष्णू, पायाजवळ नंदी, अस्थिपंजर, उभी सरस्वती, उंदीर, गणपती अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकरमूर्ती ही चतुर्हस्त असून डावा हात पार्वतीच्या कमरेवर आहे. दुसर्‍या हातात पंचफणी नाग असून तो पार्वतीच्या केशसांभारावर धरलेला आहे. उजव्या हातात त्रिशूल असून दुसरा हात आशिर्वादात्मक उभा आहे. अंगठ्यात जपमाळ असून अंगठा, अनामिका, करंगळीचा छेद गेला आहे. पार्वती द्विहस्त असून डाव्या हातात पाश आहेत तर उजवा हात शंकराच्या खांद्यावर ठेवलेला आहे. शंकरमूर्ती दोन्ही पायावर उभी असली तरी तो डाव्या पायावर रेलला आहे व उजवा पाय किंचीत सैल आहे. पार्वती डाव्या पायावर देहुडाचरण मुद्रेत उभी आहे. उजव्या तूळ पायावर चक्र आहे. या चक्रामुळेच या गावास एकचक्रनगर नाव असावे व येथे भिम-बकासुराच्या युद्धात बकासुराचा वध झाला असावा व त्यानंतर या गावाचे नांव वेळापूर झाले असावे असाही समज येथे आहे. हे मंदिर गजलक्ष्मीस अर्पण केले आहे.
या श्री अर्धनारी नटेश्‍वर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते. शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न व पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या कालावधीत विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते.

यादवकालीन या मंदिरामुळे वेळापूरला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले असले तरी पर्यटनदृष्ट्या, सोईसुविधांच्यादृष्टीने वेळापूर दुर्लक्षित राहिले आहे. माजी उपमुख्यमंत्री आ.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत भक्तनिवास येथे बांधले आहे. येणार्‍या पर्यटकांसाठी त्याचा चांगला उपयोग होत आहे. याबरोबरच मल्लसेठीचे स्मारक, अंबाबाई मंदिर, कांचन महाल, नाथ मंदिर, खंडोबा मंदिर, काळा मारूती आदि प्राचिन मंदिर येथे पहायला मिळतात. या मंदिराभोवती उंच जाळीसह संरक्षक भिंत, जमिनीवर दगडी फरशी बसवून तेथील परिसर स्वच्छ केला आहे.
पुरातन खात्याने १९७० साली मूर्ती संग्रहालय बांधले आहे. या संग्रहालयामध्ये वेळापूर व महाळूंग परिसरातील अनेक विरगळ एकत्र केले आहेत. या विरगळा पर्यटकांच्या व वेळापूरच्या दृष्टीने ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे. या विरगळा अशा पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत की त्या विरगळातून सारेगमपधनीसा या सप्तसुरांची निर्मिती होते. परंतू केंद्रीय पर्यटन खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या इमारतीची पडझड सुरू झाली आहे. ही एक धोकादायक इमारत म्हणून सध्या बंद ठेवली आहे. त्यामुळे पर्यटकांना या विरगळांचा अनमोल ठेवा पहायला मिळत नाही. इमारत धोकादायक झाल्याने हा अनमोल ठेवा त्या इमारतीखाली गाडला जाण्याची भिती निर्माण झाली आहे. पर्यायी इमारत म्हणून केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत अजून काहीही हालचाल येथे झालेली नाही.
येथे दोन प्रशस्त ऐतिहासिक वाडे आहेत. त्यापैकी एक पार्वतीच्या वाड्यात सध्या शाळा बांधण्यात आली आहे. ह्या वाड्यात यादवांचा खजिना होता. येथे मंदिरासाठी देणगी स्विकारली जाई. तसा उल्लेख तेथे सापडलेल्या शिलालेखात आहे. याची नोंद इतिहासकारांनी आपल्या संशोधनात नमूद केली आहे. वि.का.राजवाडे, गो.स.सरदेसाई, सेतू माधवराव पगडी, डॉ.तुळपुळे यांच्यासह अनेक संशोधकांनी वेळापूरला भेट देवून येथील इतिहास वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्या ग्रंथामध्ये वेळापूरचे बरेच उल्लेख आढळून आले आहेत.
वेळापूर हे आळंदी-पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वसलेले एक ऐतिहासिक गांव आहे. या गावापासून श्री क्षेत्र पंढरपूर हे केवळ ३२ कि.मी., श्री क्षेत्र सिद्धरामेश्‍वर (सोलापूर) १०० कि.मी., श्री क्षेत्र तुळजापूर १५० कि.मी., श्री क्षेत्र अक्कलकोट १५० कि.मी., शिखर शिंगणापूर (मोठा महादेव) ५० कि.मी., श्री क्षेत्र गोंदवले ६० कि.मी., निरा-भिमा या पवित्र नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर २५ कि.मी., जैन धर्मियांचे अतिशय क्षेत्र दहिगांव हे ५० कि.मी. अंतरावर आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत झालेले अकलूज हे केवळ १० कि.मी. अंतरावर आहे. अकलूजमध्ये श्री अकलाई, आनंदी गणेश, शिवपार्वती मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, यांच्यासह शिवसृष्टी, सयाजीराजे वॉटर पार्क, शिवामृत गार्डन, विद्युत कारंजे अशी पर्यटनस्थळेही आहेत.